विमानात ५ लोक होते की ६? अजित पवारांच्या अपघाताबाबत उज्ज्वल निकम यांनी केला मोठा खुलासा…

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अजित पवारांचा मृत्यू घातपात आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

त्यातच आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. उज्ज्वल निकम यांनी अजित पवार यांच्या अपघातासोबतच जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत होणाऱ्या दाव्यांवरही भाष्य केले.
पुराव्यांशिवाय केवळ संशयाच्या आधारावर निष्कर्ष काढणे हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये राजकारण टाळले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

विमानात ५ की ६ लोक होते, या प्रश्नावर उज्ज्वल निकम म्हणाले की, खासगी विमानाच्या प्रत्येक उड्डाणाची अधिकृत नोंद विमान प्राधिकरणाकडे असते. मात्र, त्या विमानात सहा प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा आजवर समोर आलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता तपास यंत्रणांच्या निष्कर्षांची वाट पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अपघाताच्या वेळी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्याने आग तीव्र झाली आणि त्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे यामागे कट असल्याचे म्हणणाऱ्यांनी ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे. केवळ संशय व्यक्त करून गंभीर विषयाला वेगळी दिशा देणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे बुधवारी सकाळी ८.१० च्या सुमारास मुंबईहून बारामतीच्या सभेसाठी निघाले होते. विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचले असता दृश्यमानता अत्यंत कमी होती. सुरक्षित लँडिंगसाठी किमान ५ किलोमीटर दृश्यमानतेची गरज असते, मात्र अपघाताच्या वेळी ती केवळ ३ किलोमीटर इतकी होती. त्यामुळे वैमानिकाने गो-अराउंड करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच दरम्यान हा भीषण अपघात घडला.
