Weather Update : थंडी गायब झाली…आता पावसाची शक्यता, राज्यात या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Weather Update : राज्यात रविवारी थंडीचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. तापमानात थोडी वाढ झाली. मुंबई, ठाणे, उपनगर व नवी मुंबईत देखील थंडी कमी होती. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थंडी कमी झाल्याचे अनुभवायला मिळाले.

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे थंडीचा जोर कमी होऊन हे तापमान वाढले असून आता या सोबत राज्यात पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचे क्षेत्र उत्तर तामिळनाडूवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आर्द्रता व दमटपणा वाढत आहे. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील चारही उपविभागात हलक्या पावसाची शक्यता आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी ५ डिसेंबरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात पुढील तीन दिवस शहरात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहील. Weather Update
तळकोकण आणि मध्य महाराष्ट्रात ३ दिवस हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्टसुद्धा देण्यात आलाय. आज ३ नोव्हेंबर रोजी राज्याचं तापमान नेमकं किती असेल जाणून घेऊया…
मुंबईकर आता कुठे थंडीने सुखावले होते, मात्र आता मुंबई आणि उपनगरात पुन्हा तापमान वाढायला सुरुवात झालीये. आज मुंबईचं कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा दमट वातावरण निर्माण होईल.
दरम्यान, पुण्यात ४ डिसेंबरपासून हलक्या पावसाची शक्यता आहे. आज इथलं कमाल तापमान२९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५ अंश सेल्सिअस एवढं असू शकते.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. तर, विदर्भात नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुक्यासह ढगाळ वातावरण कायम आहे. आज इथलं कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.