Weather Update : उन्हाच्या चटक्यापासून पुणेकरांना दिलासा मिळणार! हवामान खात्याने वर्तवली पावसाची शक्यता, जाणून घ्या…
Weather Update : पुण्यात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाचा मार्च सर्वाधिक उष्ण ठरला आहे. गेल्या वर्षी मार्चच्या पहिल्या २९ दिवसांमध्ये अवघे चार दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली होती. यंदा तब्बल २६ दिवस तापमान ३५ पेक्षा जास्त अंश सेल्सिअस नोंदले गेले, असा निष्कर्ष हवामान खात्याने दिलेल्या माहितीवरून निघाला.
अशातच आता शहरातील किमान तापमान सरासरीच्या पातळीत घसरण झाल्याने पुणेकरांना गेल्या काही दिवसांच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, ७ आणि ८ एप्रिल रोजी शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवडाभरापासून पुण्यात उन्हाचा कडाका जाणवत असून गेल्या काही दिवसांपासून किमान (रात्रीचे) तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. २९ मार्च रोजी शिवाजीनगर येथे रात्रीचे सर्वाधिक तापमान २३.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्ष ६.१ अंश सेल्सिअसने अधिक आहे. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी आदी भागात रात्रीचे तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले गेले.
तसेच १ एप्रिलपर्यंत रात्रीचे तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मात्र,२ एप्रिल रोजी तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली असून शिवाजीनगर येथे १८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोरेगाव पार्क आणि मगरपट्टा या भागात तापमान अनुक्रमे २३.९ आणि २५.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. ‘दक्षिण तामिळनाडू आणि पूर्व विदर्भादरम्यान कर्नाटक आणि मराठवाड्यातून जाणारी कमी दाबाची रेषा आहे. Weather Update
येत्या तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान राहणार असून कमाल तापमानात हळूहळू दोन अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. ५ ते ८ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. ६ ते ८ एप्रिल दरम्यान कोकण आणि गोवा आणि मराठवाड्यात आणि विदर्भात ७ ते ८ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता आहे, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
पुढील पाच दिवस पुण्यात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहील, मात्र या कालावधीत दुपार किंवा सायंकाळच्या वेळी अंशत: ढगाळ वातावरण राहील. ७ व एप्रिल ८ रोजी शहरात ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे, असं हवामान खात्यां सांगितलं आहे.
दरम्यान, पुढील अंदाजानुसार येत्या काही दिवसांत किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असली तरी पुढील ७२ तास दिवसाचे तापमान उच्चांकी पातळीवर राहील. पुण्यात येत्या ४८ तासांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.