पुणे शहरात मंगळवारी पाणी मिळणार नाही? जलसंपदा विभागानं दिला अल्टिमेटम, थेट पुरवठा तोडणार…


पुणे : पुणे शहरावर भर उन्हाळ्याच्या तोंडावर ‘पाणीबाणी’चं संकट ओढावण्याची शक्यता आहे. खडकवासला प्रकल्पाची तब्बल ९४८ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. येत्या सोमवारपर्यंत (ता. २३) पैसे जमा न केल्यास मंगळवारपासून (ता.२४) पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

या थेट इशाऱ्यामुळे पुणे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. जलसंपदा विभागाच्या मते, पुण्यासाठी ११.६० टीएमसी पाणीकोटा मंजूर असताना महापालिका दरवर्षी ८ ते ९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरते.

तसेच या जादा वापरासाठी दंडासह वर्षाला ३०० कोटी रुपये भरणे अपेक्षित आहे, मात्र महापालिकेने चालू वर्षात केवळ ९७ कोटी रुपये भरले आहेत. यामुळे थकबाकीचा डोंगर मोठा झाला आहे.

दुसरीकडे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी असा दावा केला आहे की, महापालिकेचेच ४११ कोटी रुपये जलसंपदा विभागाकडे अतिरिक्त जमा आहेत. मात्र, जलसंपदा विभागाने हा दावा ‘तथ्यहीन’ असल्याचे म्हटले आहे. “आधी थकबाकी भरा, मग दावे करा,” अशा कडक शब्दांत विभागाने पालिकेला सुनावले आहे.

दरम्यान,केवळ पाणीपट्टीच नाही, तर १३ टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीत सोडले जात असल्याने महापालिकेवर मोठा दंड आकारला जात आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत पालिकेने आधीच १.२४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरले आहे. जर दोन्ही विभागांतील हा वाद सुटला नाही, तर उन्हाळ्याच्या तोंडावर पुणेकरांना कोरड्या घशाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!