अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता? राष्ट्रवादीच्या खासदाराला संशय, पारदर्शक चौकशी करण्याची मागणी…

पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक संशय व्यक्त केले जात आहे. घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत वेगळाच संशय घेतला आहे. अजित दादांच्या विमानात बॉम्ब होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारामती येथील विमान अपघातात 28 जानेवारी रोजी अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का असा संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, दादांचं विमान जमीनीला टेकण्याआधीच विमानात स्फोट झाला आहे.
दरम्यान त्यामुळे अपघातात संशय घ्यायला जागा आहे. देवगिरी बंगला ते विमानतळ सगळे व्हिडिओ फुटेज तपासले पाहिजे. जमिनीला विमान टेकायच्या अगोदर स्फोट झाला. त्याच्यात बॉम्ब होता का? इंधनाचा स्फोट झाला की विमानांत बिघाड झाला होता? याचे सगळे डिटेल्स पुढे आले पाहिजेत, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली आहे.

संपूर्ण प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. देशातील उच्च तपासणी यंत्रणानी या अपघात प्रकरणाचा तपास करावा. अजितदादांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. अजित दादा कोणत्या गाडीने देवगिरी वरून विमानतळावर पोहोचले. कधी पोहचले. याचे CCTV व्हिडीओ तपशील मिळाला पाहिजे अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.