सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या..

पुणे : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढील तीन ते पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे.

कोकण किनारपट्टीवर विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने फळबागा आणि पाणी संरचना यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर वाढलेला असताना, हवामान खात्याच्या अहवालानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

समुद्र किनाऱ्यांवर धोका वाढल्यामुळे मच्छिमार आणि पर्यटकांनी किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या ३० मेपासून पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, अमरावती, बुलढाणा, गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात ४० ते ५० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अकोला, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
