VSR कंपनीचे अधिकारी CID च्या जाळ्यात, पुण्यात मालकाचीही कसून चौकशी ; गुपिते उलगडणार?

पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणातील अहवाल समोर आल्यानंतर आता सीआयडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे. पुणे सीआयडी कार्यालयात व्हीएसआर कंपनीचे मालक, अधिकारी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. त्यांची सीआयडीकडून कसून चौकशी केली जाणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजितदादांच्या विमाना अपघातावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून VSR कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता सीआयडी ॲक्शन मोडवर आली असून सीआयडीने ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीची कसून चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात सीआयडीने कंपनीला एक सविस्तर प्रश्नावली पाठवली असून, संचालक रोहित सिंग यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह आणि कंपनीचे कर्मचारी यांची सीआयडी कार्यालयात चौकशी सुरू आहे.विमानाचे भाडे किती होते, बुकींग कोणी केले, विमानाची तांत्रिक स्थिती काय होती आणि कंपनीची इतर कायदेशीर कागदपत्रे योग्य होती का, या सर्व बाबींचा तपास आता सीआयडी करणार आहे. या चौकशीतून आणखीन काय उलगडा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान अजित पवारांच्या प्रवासासाठी संबंधित विमानाची निवड कोणी केली? त्या दिवशी विमानासाठी वैमानिकाची नियुक्ती कोणी आणि कोणत्या निकषावर केली? विमानाचे नियमित मेंटेनन्स झाले होते का? अशा विविध मुद्यांवरील प्रश्नावली सीआयडीने व्हीएसआर कंपनीला पाठवली आहे. यावरून आता अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.