लक्ष द्या! नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची वेळ बदलली, ‘इतक्या’ वाजेपर्यंतच करता येणार मतदान…

पुणे : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं अंतिम तयारी पूर्ण केली असून, यंदाच्या मतदानात काही महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत. विशेषत: मतदानाच्या शेवटच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलामुळे मतदारांना वेळेपूर्वी मतदान केंद्रावर पोहोचणं अत्यावश्यक ठरणार आहे.

2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेतच मतदान करता येणार असून, आयोगानं या वेळेबाबत सर्व जिल्ह्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच मतदानासाठी 13,355 मतदान केंद्रे तयार ठेवण्यात आली आहेत.

ईव्हीएमद्वारे मतदान होणार असून, त्यासाठी 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानं सांगितलं की, संपूर्ण यंत्रणा 100% कार्यरत ठेवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या निवडणुकांमध्ये ‘दुबार मतदार’ या मुद्द्यावर निवडणूक आयोगानं सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारयादीत ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी आढळतात, अशांच्या नावासमोर यावेळी डबल स्टार चिन्ह ( ** ) लावण्यात येणार आहे. हे चिन्ह दिसणाऱ्या मतदारांनी कुठल्या ठिकाणी मतदान करणार आहेत याची माहिती मतदान केंद्रावर द्यावी लागणार आहे.
कोणताही मतदार दोन वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करू नये, यासाठी आयोगानं हा विशेष उपाय अवलंबला आहे. एका ठिकाणी मतदान झाल्यावर सिस्टममध्ये त्याची नोंद होईल आणि तो मतदार दुसऱ्या ठिकाणी मतदान करू शकणार नाही. गेल्या काही निवडणुकांमध्ये दुबार नावांमुळे अनेक तक्रारी मिळाल्याने आयोगानं या वेळी अधिक कडक तयारी केल्याचं दिसून येतं.
मतमोजणी 3 डिसेंबर रोजी…
मतमोजणी पुढील दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं कडेकोट सुरक्षा व सीसीटीव्ही व्यवस्थाही लागू केली आहे. मतमोजणीनंतर निकाल जाहीर करताना पारदर्शकता राखण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग, अतिरिक्त निरीक्षक आणि तांत्रिक पथकांना तयार ठेवण्यात आले आहे.
