मतदानाचा टक्का वाढणार!१५ जानेवारीला कुणाकुणाला मिळणार सुट्टी, महत्त्वाची माहिती समोर

पुणे : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या दिवशी महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाचा टक्का अधिक वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या दिवशी शाळा, सरकारी कार्यालये, बँका, खासगी कंपन्यांना सुट्टी असणार आहे.

मुंबई महानगर पालिकाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगरातील जिल्ह्यांसह पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी १५ जानेवारीला शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे.
मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि खासगी कंपन्यांना सुट्टी असणार आहे. सार्वजनिक सुट्टी ही फक्त सरकारी कार्यालयांपुरती मर्यादित नसणार आहे. १५ जानेवारीला केंद्र आणि राज्य शासनाची सर्व कार्यलये, सार्वजनिक उपक्रम आणि निमशासकीय संस्थांना सुट्टी असेल. सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांना सुट्टी असणार आहे.

तसेच आयटी कंपन्या, शॉपिंग सेंटर, खासगी कंपन्या, मॉल्स, रिटेलर्स यांना देखील सुट्ट्या असणार आहेत. त्याचसोबत सर्व कारखाना, दुकाने, खाद्यगृहे, नाट्यगृहे, निवासी हॉटेल्स आणि औद्योगिक उपक्रम याठिकाणी देखील सुट्टी असेल.
तसेच अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजेच जिथे पूर्ण दिवस सुट्टी दिल्यास मोठे नुकसान होऊ शकते अशा ठिकाणी कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी न देता २ ते ३ तासांची विशेष सूट देणे बंधनकारक असणार आहे. जेणेकरून ते कामगार त्या वेळेत मतदान करू शकतील.अत्यावश्यक सेवांमध्ये २–३ तासांची सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे.