इंदापुर बसस्थानकात बसमध्ये बसण्याच्या जागेवरून जोरदार हाणामारी, ११ जणांविरोधात गुन्हा दाखल, ७ महिलांचा समावेश, नेमकं काय घडलं?

इंदापूर : येथील बसस्थानकात एसटी बसमध्ये बसण्याच्या जागेवरून जोरदार हाणामारी झाली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. याप्रकरणी 11 जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या गुन्हात तब्बल 7 महिलांचा समावेश आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन सोपान बोंबे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपींवर 11 जणांविरोधात सामाजिक शांतता बिघडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या वादाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे.
दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अकलूज-पुणे एसटी बस इंदापूर बसस्थानकावर आली. यावेळी बसमध्ये प्रवेश करण्यासह बसण्याच्या जागेच्या वादावरून गोंधळ सुरु झाला. यातूनच हा प्रकार घडला आहे. यामध्ये अजय रमेशचंद्र तिवारी (मुंबई), वैभव ललीत गोरे (मुंबई), विक्की सुबोध सिंग (झारखंड), प्रिया दिपक सोळंकी (मुंबई), रिपल रत्नाकर त्रिपाठी (ठाणे), प्राजक्ता दिनानाथ कहार (पालघर), पिंकी प्रेम सिंग (पालघर), जोहा समीर शेख (ठाणे), कशीश प्रकाश महाजन (कल्याण), आकाश हनुमंत शिंदे (इंदापुर), आरती आकाश शिंदे ( इंदापुर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

यावेळी प्रवाशांसमोरच झालेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होत. इंदापूर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप हा वाद आटोक्यात आणला. त्यानुसार 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.