Vinesh Phogat : विनेश फोगाटने भाजपला लोळवलं! भाजपच्या योगेश कुमार यांचा केला पराभव…
Vinesh Phogat : हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून काही जागांचे निकाल हाती आले आहेत. भाजपने निकालांमध्ये आघाडी घेतली असली तरी काँग्रेसच्या बहुतेक महत्त्वाच्या उमेदवारांनी निराशा केलेली नाही. कुस्तीपटू विनेश फोगाट यापैकीच एक आहे.
विनेशनं आपली पहिली-वहिली निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगट विजयी झाल्या. भाजपचे योगेश बैरागी यांचा ६ हजार १५ मतांनी पराभव केला.
विनेश यांना ६५०८० मते मिळाली तर योगेश कुमार यांना ५९०६५ मते मिळाली. कुस्तीपटूंचे आंदोलन आणि ऑलिम्पिक अपात्रतेमुळे चर्चेत आलेल्या विनेश फोगट यांना काँग्रेसने निवडणूक मैदानात उतरवले होते. Vinesh Phogat
हरियाणा विधानसभा निवडणुकीत सर्वांच्या नजरा जुलाना मतदारसंघाकडे लागल्या होत्या. जुलाना येथे १.८७ लाख मतदार असून त्यापैकी ७० टक्के मते जाट समाजाची आहेत. यावेळी ५ पैकी ४ प्रमुख पक्षांनी जाट उमेदवारांना तिकीट दिले होते. या जागेवरून दोन महिला कुस्तीपटूंमध्येही लढत झाली. काँग्रेसकडून विनेश फोगट तर भाजपकडून योगेश बैरागी मैदानात होते.
आम आदमी पार्टीनेही WWE महिला कुस्तीपटू कविता दलालवर यांना उमेदवारी दिली होती. INLD-BSP युतीकडून डॉ. सुरेंद्र लाथेर आणि जननायक जनता पक्षाचे आमदार अमरजीत सिंह धांडा यांनी निवडणूक लढवली. मात्र विनेश फोगट आणि भाजपचे योगेश बैरागी यांच्यातच थेट लढत झाली. सोशल मीडियावरही या मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू होती.
जुलाना येथून विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संघर्षाचा मार्ग निवडलेल्या प्रत्येक मुलीचा आणि महिलेचा हा लढा आहे. हा संघर्षाचा आणि सत्याचा विजय असून देशाने दिलेले प्रेम आणि विश्वास कायम जपेन, असे विनेश यांनी म्हटले आहे.