पुण्यात ट्रेकिंगसाठी गेलेल्या 50 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! कड्यामध्ये अडकलेल्या पोरांना गावकऱ्यांनी वाचवलं, नेमकं काय घडलं?


पुणे : पुण्यातील वेल्हे तालुक्यातील निसर्गरम्य मढेघाट परिसरात ट्रेकिंगचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण ट्रेकिंगला येतात. अशातच शालेय विद्यार्थ्यांवर निसर्गाचा कोप झाल्याचं पहायला मिळालं.

पुण्याच्या राजगड तालुक्यातील मढेघाट परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्या मोहोळांच्या मधमाशांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये 35 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. काल ४ जानेवारीच्या संध्याकाळी ही घटना घडली.

या अनपेक्षित संकटामुळे मढेघाट ते उपंडा असा ट्रेक करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी पळापळ झाली. सुदैवाने, स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या अफाट धैर्यामुळे आणि तातडीने केलेल्या मदतीमुळे या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.

पुण्यातील एका खासगी साहसी ट्रेकिंग क्लासच्या माध्यमातून सुमारे 50 हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक या ट्रेकसाठी आले होते. यामध्ये प्रामुख्याने 14 ते 17 वयोगटातील मुलांचा समावेश होता.

मढे घाट उतरल्यानंतर मध्यभागी असलेल्या गर्द झाडीतून जात असताना झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या माशा उठल्या आणि त्यांनी थेट विद्यार्थ्यांवर हल्ला केला. मधमाशांच्या डंखापासून वाचण्यासाठी विद्यार्थी सैरभर झाले, मात्र या धावपळीत 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 8 ते 10 विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून, इतर 25 जणांना मधमाशांनी शरीरावर ठिकठिकाणी चावा घेतला आहे.

घटनेची माहिती मिळताच तोरण माची हॉटेलचे मालक अभिजीत भेके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केलं. यानंतर केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे आणि इतर स्थानिकांनी कड्यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने 108 रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांमधून वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना होणे, चक्कर येणे, उलटी आणि चेहऱ्यावर प्रचंड सूज येणे अशी लक्षणे या विद्यार्थ्यांमध्ये दिसत होती. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास आणि त्यांच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!