सोरतापवाडीत ‘पारंबी कलादालन’ महोत्सवाला ग्रामस्थांची पसंती; दर्जेदार वस्तूंनी बाजारपेठ सजली; ग्रामस्थांनी उपक्रमातून दिली महिलांना प्रेरणा…

उरुळीकांचन : स्वावलंबी व आत्मनिर्भर स्त्री घडविण्यासाठी तसेच महिलांना उद्योग व व्यवसायात प्रेरणा देण्याच्या उद्देशाने सोरतापवाडी (ता.हवेली ) येथे भरविण्यात आलेल्या ‘ पारंबी कलादालन’ या उपक्रमास गावकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन या वाटचालीत महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा या प्रयत्नात सहभागी असल्याची साक्ष ग्रामस्थांनी दिली आहे.

भीमथडी व कृषी प्रदर्शन सारख्या उपक्रमातून एका व्यावसायिकाला आपल्या व्यावसायिक उत्पादन बाजारात विक्री करण्याच्या मिळालेल्या संधीतून व्यावसायिक घडविण्याचा झालेला प्रयत्न या धर्तीवर गावातील महिलांना एक व्यावसायिक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने जेके फाऊंडेशन व ग्रामपंचायत सोरतापवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने’पारंबी कलादालन’ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सुमारे ५० वस्तू व पदार्थाचे दालन उभे करीत महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

महिलांनी दालनात मांडलेल्या हातकाग वस्तू, कपडे, विणकाम, सौंदर्य प्रसादणे, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच खाद्यपदार्थाचे भरगच्च दालन उभे केले होते. या वस्तूंना ग्रामस्थ पसंती देऊन खरेदी करुन महिलांना व्यावसायिक उपक्रमासाठी प्रोत्साहन देत होते. दर्जेदार उत्पादने व महिलांची इच्छाशक्ती या कार्यक्रमात पहायला मिळून महिलांचाआत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न झाला.

दरम्यान या महोत्सवासाठी ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर,हपुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे, साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षा वंदना काळभोर , पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी,अजिंक्य कांचन,सरपंच सुनिता चौधरी, उपसरपंच विलास चौधरी, पुनम चौधरी, राजेंद्र चौधरी,शंकर कड ,सनी चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड उपस्थित होते. तर आयोजन शितल जयप्रकाश चौधरी यांच्या वतीने करण्यात आले होते.
