वडिलांच्या कष्टाला मिळाला न्याय! भाजी विक्रेत्याच्या मुलाचा यूपीएससीवर झेंडा; चंद्रकांत पाटील यांच्याकडून शुभेच्छा
पुणे : पुण्यातल्या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने यूपीएससीची सीएसई परीक्षा क्रॅक करून दाखवली. दुसऱ्या प्रयत्नात सिद्धार्थ किशोर भांगे या पुण्यातील खराडी इथे राहणाऱ्या या मुलाने मोठे यश मिळवले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही त्याचे कौतुक केले. आज आपल्या निवासस्थानी सिद्धार्थचा सत्कार करुन, भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सिद्धार्थनं परीक्षाचे निकाल जाहीर झाल्यानंतर खूप भारी वाटतंय खूप वर्षाची मेहनत होती ती आता पूर्ण झाली असल्याचे म्हटले आहे. खूप दिवसांची इच्छा होती ती पूर्ण होतंय, घरचे देखील आज खूप खूष झाले असून त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी एवढ्या स्टेजपर्यंत पोहोचलो, असं सिद्धार्थ म्हणाला.
कुटुंब चालविण्यासाठी वडील भाजी विक्री करायचे. त्यानंतर त्यांनी रिक्षा चालविण्यास सुरूवात केली. वडिलांच्या कष्टातूनच प्रेरणा घेतली. त्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी मीही खूप परिश्रम घेतले. त्यांच्या कष्टाचे चीज करणे हेच माझ्यापुढे आव्हान होते. ते मी प्रामाणिकपणे पेलण्याचा प्रयत्न केला. त्याचेच हे फळ आहे.
दुसऱ्या प्रयत्नात उतीर्ण झालो असलो तरी त्यामागे खूप वर्षांची मेहनत असल्याचे सिद्धार्थने यावेळी सांगितले. तो म्हणाला, “अकारावीत असतानाच ‘यूपीएससी’ करण्याचे ठरविले होते. वाडिया महाविद्यालयातून राज्यशास्त्रातून ‘बीए’ची पदवी घेतली.
कोविड काळापासूनच अभ्यासाला सुरुवात केली. कुणालाही एका रात्रीत यश मिळत नाही. त्यासाठी प्रामाणिक कष्टासह सयंमाची खूप गरज लागते. ‘सोशल मीडिया’मुळे तरुणांमध्ये सयंमाचा आभाव जाणवत आहे. मी सोशल मीडियापासून दूर राहिलो. असे देखील त्याने सांगितले.
सिद्धार्थच्या या यशाबद्दल आज पालकमंत्री पाटील यांनीही कौतुक केले असून, आपल्या कोथरुड मधील निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. तसेच भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धात्मक परीक्षांमध्ये UPSC ची नागरी सेवा परीक्षा अर्थात Civil Services सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर मेहनत घेत असतात. पण सिद्धार्थ भांगे याचे विशेष कौतुक वाटते.
कारण, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करुन, त्याने हे यश संपादन करुन, पालकांच्या कष्टाचे खरे चीज केले आहे. त्याने भविष्यातही आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर नावलौकिक कमावावा. सिद्धार्थचे हे यश अनेक तरुणांना प्रेरणा देईल यात शंका नाही, अशा शुभेच्छा दिल्या.