VBA Candidate List : विधानसभेसाठी वंचितचा धमाका, ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, तृतीयपंथी शमिभा पाटील यांना दिली उमेदवारी…
VBA Candidate List : राज्यात लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून टाकली आहे.
रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. शमिभा पाटील ह्या लेवा पाटील समाजातील आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
सिंधखेडा राजा येथून सविता मुंढे, वाशीमधून मेघा किरण डोंगरे, धामनगाव रेल्वे येथून निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम येथून विनय भांगे, साकोली येथून डॉ. अविनाश नन्हे, नांदेड दक्षिण मधून फारुक अहमद, लोहा येथून शिवा नरंगले, औरंगाबाद पूर्व येथून विकास रावसाहेब दांडगे, शेगाव येथून किसन चव्हाण आणि खानापूर येथून संग्राम कृष्णा माने यांची वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. VBA Candidate List
वंचितने त्यांच्या आघाडीमधील भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या उमेदवारांचीही घोषणा केली आहे. अनिल जाधव हे भारत आदिवासी पार्टीचे चोपडा येथून उमेदवार असतील. तर हरीश उके यांना रामटेकमधून उमेदवार दिली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेत्यांनी मतदारसंघनिहाय दौरेही सुरू केलेत. जागा वाटपाची चर्चा, यात्रा, सभा, दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालीही सुरु आहेत.