स्वतःला महादेवाचा अवतार समजणाऱ्या वसईच्या भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; पुण्यात येताच मिळालं ‘कर्माचं फळ’

पुणे: नाशिकच्या खरात प्रकरणानंतर पुण्यातील एका 35 वर्षीय महिलेवर अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने एका स्वयंघोषित धर्मगुरूंनी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्वतःला महादेवाचा अवतार समजणारा धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिकच्या खरात प्रकरणानंतर पुण्यातील पीडित महिलेने धाडस दाखवून आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितल्यानंतर पुण्यातील हडपसर (मांजरी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हा भोंदू बाबा फरार झाला होता. गुन्हा दाखल होताच पुणे पोलिसांची विविध पथके ऋषिकेश वैद्यचा माग काढत होती. अखेर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास तो पिंपरी परिसरात असल्याची पक्की माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
ऋषिकेश वैद्य याच्यावर केवळ या एका महिलेवरच नव्हे, तर इतरही अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याला अटक केल्यानंतर आता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात येणार आहे. या काळात त्याच्याकडून इतर पीडित महिलांची माहिती आणि त्याने केलेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास केला जाणार आहे.

वसईचा रहिवासी असलेल्या ऋषिकेशने फेसबुकच्या माध्यमातून पुण्यातील एका विवाहित महिलेशी मैत्री केली होती. पुण्यात येऊन महिलेला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने आधी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, जी नंतर तपासासाठी हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती. अखेर या भोंदू बाबाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत