संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथीनिमित्त उरुळी कांचन येथे विविध कार्यक्रम संपन्न..
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील श्रीराम मंदिरामध्ये संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या ७२८ व्या पुण्यतिथीनिमित्ताने रविवारी (ता. १६) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
तसेच तिखे गुरुजी व श्री शुभम वेदपाठक यांनी सकाळी पारायणास सुरुवात केली होती. सत्यनारायण महापूजा व अभिषेक संपन्न झाला. तसेच संत सावता माळी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिषेक व पूजा करण्यात आली.
या सोहळ्याचे आयोजन व नियोजन उरुळी कांचन येथील अखिल माळी समाज संघ सर्व पदाधिकारी व सभासदांनी सावतामाळी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे नियोजन केले होते.
महाप्रसादाचे आयोजन…
भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाविक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रीराम देवस्थान सप्ताह कमिटी यांनी सकाळी आणि श्री गुरुदत्त भजनी मंडळ यांनी संध्याकाळी सुश्राव्य अशी भजन सेवाही समर्पित केली. भजनी मंडळातर्फे भजनसंध्येचा कार्यक्रम घेण्यात आला.
दरम्यान, कोणत्याही राष्ट्रसंत किंवा महापुरुषांचे कार्यक्रम सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन संपन्न करण्यासाठी आग्रही भूमिका किंवा प्रयत्न करणार असल्याचा उरुळी कांचन माळी समाज संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मानस व्यक्त केला.
संत शिरोमणी सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी श्रीराम मंदिरामध्ये साजरी होताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक ग्रामस्थांनी, संस्थांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल, उरुळी कांचन माळी समाज संघाने सर्वांचेच आभार व्यक्त केले.उरुळी कांचन माळी समाज संघाने दरवर्षीच्या पूजेसाठी सावता माळी महाराजांची चार फूट नवीन मूर्ती बनवून घेतली.
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उरुळी कांचन मध्ये समता आणि एकतेचे प्रतीक असणारे सर्व प्रमुख राष्ट्रसंत आणि महापुरुषांचे स्मारक एकत्रितरित्या तयार होण्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली.