साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी वंदना काळभोर तर उपाध्यक्षपदी विकास तुपे यांची बिनविरोध निवड…


लोणी काळभोर : हडपसर येथील साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी वंदना राजकुमार काळभोर यांची तर उपाध्यक्षपदी विकास तुपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वंदना काळभोर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर लोणी काळभोर सह परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

मावळते अध्यक्ष जानकु तुळजाराम कदम व उपाध्यक्ष प्रताप शंकर बोरकर यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे उपनिबंधक ज्ञानदेव हंसारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.17) पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये अध्यक्षपदासाठी वंदना काळभोर उपाध्यक्ष पदासाठी विकास तुपे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक वाबळे यांनी काळभोर यांची अध्यक्षपदी, तर तुपे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

दरम्यान, साधना सहकारी बँक ही गेली 48 वर्षे पुण्याच्या पूर्व भागात आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली बँक आहे. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून महाराष्ट्रामध्ये 28 शाखा व एक विस्तारीत कक्ष व एक मुख्य कार्यालय असा बँकेचा विस्तार आहे. बँकेला सतत ऑडीट वर्ग “अ” असून गेली 19 वर्षे शून्य टक्के एन पी ए ठेवला आहे. सभासदांना दरवर्षी दहा टक्के लाभांश दिला जात आहे, सभासदांसाठी मोफत आरोग्य तपासणी, कुटुंबनियोजन अनुदान सभासदांच्या पाल्याकरिता शैक्षणिक अनुदान, दुर्धर आजारासाठी आर्थिक अनुदान अशा स्वरूपाच्या सेवा सुरू आहेत.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्षा वंदना काळभोर म्हणाल्या की, आगामी काळात बँकेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. बँकेच्या सर्व सुविधा प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य जनतेसाठी पोचविणार आहे. तसेच संचालकमंडळ आणि सर्व सदस्यांना एकत्र घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!