ठाकरेंशी एकनिष्ठ असणाऱ्या वैशाली सूर्यवंशीनीं शिवबंधन सोडलं; भाजपात पक्षप्रवेश केल्याने खळबळ..

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाला जळगावात मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पडत्या काळात साथ देणाऱ्या अनेक निष्ठावंत नेत्यांनी आधीच साथ सोडली असताना आता ठाकरेंशी एकनिष्ठ असणाऱ्या वैशाली सूर्यवंशी यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत जळगावातील पाचोरा भडगाव हा मतदारसंघ प्रामुख्याने चर्चेचा विषय बनला होता, कारण या ठिकाणी बहीण आणि भावामध्ये लढत रंगली होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून किशोर पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाकडून त्यांचीच बहीण वैशाली सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. भावाने बहिणीवर वरचढ ठरत बाजी मारली, पण त्यानंतरही उद्धव ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही, असा शब्द देणाऱ्या वैशाली सूर्यवंशी अचानक भाजपमध्ये का गेल्या, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मुंबईत काल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वैशाली सुर्यवंशींनी पाचोरा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, मतदारसंघातील राजकीय समीकरणे यामुळे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.