मोठी बातमी! आझाद मैदान परिसर रिकामं करा, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना बजावली नोटीस, वातावरण तापलं…

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्या कोअर कमिटीला तातडीने मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली आहे.

यामुळे आंदोलनाचं भवितव्य काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरुप आले आहे.
त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिलेत. तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी,मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते. त्यानंतर मुंबईत पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार आंदोलकांनी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, मुंबईत जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून खारघर, नवी मुंबई येथे पर्यायी ठिकाण उपलब्ध करून देण्याचेही निर्देश दिले होते.
या आदेशाची अट मान्य करून जरांगे यांना २९ ऑगस्ट रोजी एक दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र या अटींचं उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी आता नोटीस बजावली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी कोअर कमिटी सदस्यांना दिलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी फक्त एका दिवसापुरती होती.
त्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्यात आलं असून, हे न्यायालयीन आदेश आणि ‘जाहिर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम २०२५’ यांचं उल्लंघन आहे. त्यामुळे मैदान तातडीने रिकामं करावं, असा आदेश पोलिसांनी दिला आहे. शिवाय जरांगे यांनी प्रसारमाध्यमांवर केलेल्या काही विधानांचाही उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.