Uttarakhand : उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा, विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर करणार..

Uttarakhand : पुढील आठवड्यात उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला जाणार असल्याची माहिती आहे. तसे झाल्यास उत्तराखंड हा कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरणार आहे. तसेच दिवाळीनंतर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवले जाणार आहे, त्यामध्ये हे विधेयक मंजुर मांडले जाणार आहे.
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी विचारविमर्ष करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली ही समिती काम करत होती. ही समिती येत्या एकदोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समान नागरी कायद्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समान नागरी कायदा लागू करण्यासाठी उत्तराखंड राज्य विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन दिवाळीनंतर बोलावले जाऊ शकते. या अधिवेशनात समान नागरी कायद्याचे विधेयक मंजूर करून त्याला कायदेशीर रूप देण्यात येईल. Uttarakhand
समान नागरी कायद्याअंतर्गत विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक घेणे अशा वैयक्तिक बाबींमध्ये सर्वधर्मीय लोकांसाठी समान नागरी कायद्याच्या रूपात एकच कायदा अस्तित्वात येईल.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते पुष्कर सिंह धामी यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही सत्तेत आल्यास समान नागरी कायदा लागू करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर सत्तेत येताच धामी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती.
सध्या राज्यात असलेल्या वैयक्तिक कायद्यांचे पुनरावलोकन करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली होती. या समितीने आपला अभ्यास आता पूर्ण केला असून आगामी काही दिवसांत ही समिती आपला अहवाल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे सोपवणार आहे. त्यानंतर लवकरच समान नागरी कायदा विधेयकाचे कायद्यात रुपांतर केले जाऊ शकते.