उरुळीकांचन शहरात दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांची संयमाची भूमिका! शांततेत ठेवणार उद्या शहर बंद..!!

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोघा सख्ख्या भावांनी केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उरुळी कांचन शहरात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती दुसऱ्या दिवशी निवळली असून या आरोपींवर कठोर कारवाईची मागणीची चर्चा ग्रामस्थांत दुसऱ्या दिवशी ऐकू येत होती. ग्रामस्थांनी घटनेचा निषेध म्हणून शनिवार (दि.१५) शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निर्णयाचा व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

उरुळी कांचन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन सख्या भावांनी मागील पंधरा दिवसांपासून आईवडीलांना जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला होता. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर ग्रामस्थांत प्रचंड संतापाची लाट उसळून ग्रामस्थांनी घटनेच्या निषेधार्थ शहरातून प्रचंड मूक मोर्चा काढला होता.
संबंधित पीडित युवतीला न्याय मिळावा मुख्य आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हजारो नागरीक रस्त्यावर उतरले होते. यावेळी घटनेचा निषेध म्हणून उरुळी कांचन शहर शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनासमोर घेतला होता.

आता शहरातील ग्रामस्थांच्या बंद च्या हाकेत व्यापाऱ्यांनी आपला पाठिंबा बंदला दर्शविला आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण दिवसभर शहरात अत्यावश्यक सेवा, शाळा, महाविद्यालये वगळून संप पाळण्यात येणार आहे.
दरम्यान बलात्काराची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारीच (दि.१३) रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता ,न्यायालयाने त्यांना १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान उरुळीकांचन शहरात घटनेच्या दुसऱ्या दिवशी शांतता होती. पुणे शहर पोलिस उपा – युक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांनी परिस्थितीची पाहणी करुन पोलिस तपासाची माहिती घेतली.