उरुळीकांचन पोलिस ठाणे अद्याप वेटींगवरच! १५ ऑगस्टला पोलिस ठाणे निर्माण होण्याची शक्यता मावळली…!
जयदीप जाधव
उरुळी कांचन : लोकाभिमुख प्रशासन, गतिमान शासन ‘ हे घोषवाक्य घेऊन शासन योजनांना तत्परतेप्रमाणे जनतेपर्यंत पोहचविण्याची किमया सांगणाऱ्या राज्य शासन व प्रशासनाला पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘कासव’ शर्यतीने आपले निर्णय पूर्ण करण्यासाठी वेळ खर्ची करावी लागत असल्याची परिस्थिती आहे.
शासन हे नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर निर्णय घेतेमात्र निर्णयांची अंमलबजावणी होण्यास वर्षेनुवर्षे उजडतात अशी म्हणण्याची वेळ अंमलबजावणीच्या वेळखाऊपणाने समोर येत आहे. अशाच एका निर्णयाची अंमलबजावणीची प्रमाणवेळ उलटत चालल्याने नागरीकांवर म्हणण्याची वेळ आली आहे.
उरुळी कांचन परिसरासाठी अडीच वर्षापूर्वी स्वतंत्र पोलिस ठाण्याचा शासन निर्णय होऊनही अंमलबजावणीसाठी मात्र अडीच वर्षे उलटून कार्यवाही होत नसल्याने नागरीक आता ‘तारीख पे तारीख’ या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे.
अडीच वर्षे २६ जानेवारी, १ मे व १५ ऑगस्ट अशा राष्ट्रीय गौरव दिनी या पोलिस ठाण्याचा कार्यआरंभ होईल अशी नागरीकांची अपेक्षा आता ‘ बोलाची कडी बोलाचा भात’ अशी आवस्था पहायला मिळत आहे. वास्तविक अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकारने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी पुणे जिल्ह्यासाठी ५ नवीन पोलिस ठाणे मंजूर केली.
त्यातील बारामती तालुक्यात सांगवी, सुपे,आंबेगाव तालुक्यात पारगाव, इंदापूर तालुक्यात निरा -नृसिंहपूर अशी पोलिस ठाणे मंजूर केली आहे. त्यासाठी शासन खर्च अस्थापणा, इमारत खर्च अशा खर्चांची तरतूद केली आहे.
त्यापैकी माळेगाव व पारगाव ही पोलिस ठाणे कार्यान्वित झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलातून २३ मार्च २०२१ रोजी पुणे शहर पोलिस आयुक्तालयात लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचा सामावेश झाला आहे. पुणे शहरात पोलिस ठाण्यांचा परिघ हा ५ किलोमीटर कार्यक्षेत्रात असताना लोणीकाळभोर पोलिस ठाणे प्रत्यक्षात २५ किलोमीटर परिघात अस्तित्वात आले आहे.
तीन वर्षाच्या काळात शहर पोलिस दलातील नागरीकांना अपेक्षित वाहतूक कोंडी, सायबर गुन्हेगारी, क्राईम , सामाजिक सुरक्षा असे विभागांकडून दखल घेण्याईतकी कामगिरी झाली काय,असा प्रश्न येथून सातत्याने उपस्थित झाला आहे. अशातही उरुळी कांचन परिसरात गुन्हेगारांचे माहेरघर, दहशत, दादागिरी, हप्ते वसूली , अवैध धंदे हे सत्र चालूच आहे. मग शहर पोलिस सुरक्षा कशासाठी? हा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे.
गेल्या अडीच वर्षापूर्वी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यातून उरुळी कांचन हे स्वतंत्र पोलिस ठाणे ग्रामीण अधिक्षक अंतर्गत मंजूर आहे. यासाठी शासनाने १० कोटी खर्चाची मंजूरी दिली आहे. १ विरिष्ठ निरीक्षक, १ पोलिस निरीक्षक, ४ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ५ उपनिरीक्षक तसेच हवालदार, शिपाई व पोलिस नाईक म्हणून १०० कर्मचाऱ्यांना मंजुरी आहे.
परंतु गेली अडीच वर्षे हे पोलिस ठाणे कार्यान्वित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. चालू ऑगस्ट महिन्यात १५ ऑगस्ट रोजी हे पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी अंतर्गत बैठका झाल्या मात्र हे नियोजन लांबणीवर पडण्याची स्थिती आहे.