Uruli Kanchan : छातीला नेमप्लेट, डोक्याला हेअर ड्राय करीत, पन्नास वर्षानंतर जुने मित्र भेटले! ‘उरुळीकांचन’ला असाही रंगला विद्यार्थी स्नेहमेळा..!!
Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता अकरावीच्या वर्गाचे १९७२ -७३ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन येथे आयोजित करण्यात आला होता. हे विद्यार्थी तब्बल पन्नास वर्षानंतर एकमेकांना भेटले. ह्या ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी भेटीचा पुरेपूर आनंद त्यांनी घेतला. अकरावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी शाळेतून जाधव सर यांनी दिली. Uruli Kanchan
परंतु त्यांचे फोन नंबर शोधणे फारच कठीण होते. परंतु सर्व मित्रांनी शर्तीचे प्रयत्न करून त्यापैकी चारही तुकड्यांतील विद्यार्थी विद्यार्थिनींचा शोध घेतला. दुर्दैवाने त्यातील १४ जणांचे निधन झाले आहेत. जिद्दीने उर्वरित १४८ पैकी ७० मैत्रिणी आणि मित्र या कार्यक्रमाला आले. रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला.
गंमत म्हणजे यातील बरेच जण खऱ्या अर्थाने पन्नास वर्षानंतरच भेटणार होते, त्यामुळे त्यांना भेटीची फारच उत्सुकता लागली होती. त्यामुळे आयोजकांनी एक शक्कल लढविली, सरळ प्रत्येकाच्या नावाची एक लॅमिनेटेड पट्टी तयार करून ती प्रत्येकाने आपल्या छातीवर लावली व त्यामुळे एकमेकांची ओळख सहज पटली त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
भेटीचा आनंद सुखदुःखाच्या गप्पा असा अतिशय संमिश्र असा योग या कार्यक्रमात पाहण्यास मिळाला. उपस्थितांपैकी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात चांगला नावलौकीक मिळवून वृद्धापकाळाचा आनंद घेत आहेत. त्यातही आनंदाची बाब म्हणजे या विद्यार्थ्यांना जे शिक्षक शिक्षिका शिकविण्यास होते ते देखील यांना पुन्हा शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी उपलब्ध होते. Uruli Kanchan
हा एक दुर्मिळातील दुर्मिळ असा योग पहाव्यास मिळाला. या सुवर्ण महोत्सवी स्नेह संमेलन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले सर यांनी भुषविले. १९७२-७३ च्या काळातील, तुळशीराम उर्फ तु द. टिळेकर, सर सिदिड सर, रत्नप्रभा भोर बाई साळुंखे बाई, खिरे सर, कुंभार सर असे वृद्ध शिक्षक देखील आशीर्वाद देण्यासाठी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध होते.
यावेळी सुमती वेदपाठक बाईं यांचा आशीर्वादपर संदेश रूपाने आला होता, भुजंगराव कानकाटे यांनी वाचून दाखवला. असा हा गुरु शिष्यांच्या भेटीचा योग आनंददायी व दुर्मिळ होता. या कार्यक्रमाचे आयोजन त्याच वर्गातील माजी विद्यार्थी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन , अरुण कांचन, बापू ढवळे, दिलीप गोलांडे, भुजंगराव कानकाटे, हरिश्चंद्र लोखंडे, संदीप बाजारे आणि एकनाथ ताम्हाणे यांनी केले. तसेच डॉ.मणिभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी ऋण व्यक्त केले. तर आभार विमल आतकिरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाची या परिसरात खूपच चर्चा रंगली होती.