उरुळी कांचन येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ उत्सव उद्यापासून ; आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेल…!
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ उत्सव सोमवारी (दि. ०६) सुरु होत आहे. त्या निमित्ताने श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (दि. ०६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तलाठी कार्यालयासमोर होळी पूजन करण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी (दि. ०९) मारुती मंदिर या ठिकाणी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भराड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. १०) “मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले असून या मध्ये महिला व पुरुष असे दोघेही सहभाग घेऊ शकतात. यामध्ये विजेत्या पुरुष व महिला गट विजेत्यांना स्मृती चिन्ह व मेडल देण्यात येणार आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात “लावण्य चंद्रा धमाका २०२३” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. ११) काळभैरवनाथाची पूजा व अभिषेक सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिर येथे होणार आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शानिवारी (दि. ११) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास श्रींच्या पालखीचा मिरवणुकीचा (छबिना) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पालखीच्या पुढे विविध गावचे “ढोल लेझीम” पथकांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी (दि. १२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तोरण तोडण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कुस्त्यांचा जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले असून १३ निकाली कुस्त्या होणार आहेत. पहिलवानांच्या कुस्त्या चितपट व निकाली होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रेम करावं पण जपून हे नाटक महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात पाहायला मिळणार आहे. तसेच नाटकाच्या मध्यभागी फटाक्यांची आतिषबाजी चे नियोजन करण्यात आले आहे.