Uruli Kanchan : संत तुकाराम पालखी महाराज पालखी मार्गस्थ झाल्यानंतर उरूळी कांचन पोलिस करणार शहरातील वाहतुकीत बदल! वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पोलिस करणार उपाय..

Uruli Kanchan उरुळी कांचन : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळीकांचन शहराच्या हद्दीतील निर्माण होणाऱ्या अभूतपूर्व वाहतुक कोंडीच्या समस्येला सोडविण्यासाठी उरुळीकांचन ग्रामीण पोलिस ठाण्याकडून वाहतूक नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. या नियोजित केलेल्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी लोकप्रतिनिधींची एक बैठक होणार असून नागरीकांच्या सूचना घेऊन या आराखड्याची अंमलबजावणी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या मार्गावरुन मार्गस्थ झाल्यानंतर सर्वसहमतीने करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.
पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडीचा मुद्दा अतिशय जिकीरीचा झाला आहे. या ठिकाणी होत असलेल्या वाहतुक कोंडीच्या समस्येने नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. वाहतुकीच्या लांबच्या लांब लागत असलेल्या रांगांमुळे प्रवाश्यांना या ठिकाणी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतुकीत तासनतास प्रवासी अडकून पडणे, प्रवाशांचा वेळ जाणे, जलद वाहतूक खीळ बसणे, अत्यावश्यक उपचाराची गरज असणाऱ्या रुग्णांच्या जिवावर बेतणे, पोलिस यंत्रणेवर ताण पडणे या सहीत शहरातील छोट्या -मोठ्या व्यावसायावर मोठा परिणाम झाला असून अशा स्वरुपात वाहतुक समस्या नागरीकांना डोकेदुखी ठरली आहे.
सुट्टीच्या दिवशी तर वाहतुक कोंडीचा मोठा भस्मासुर झाल्याचे चित्र या ठिकाणी आहे. या हद्दीत महामार्गालगत झालेले बांधकाम व या बांधकाम काढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसह महामार्गाचे विशेष अधिपत्य असलेल्या एनएचएआय फारसे गांभीर्य दाखवित नसल्याची स्थिती आहे. तर स्थानिक लोकप्रतिनीधी या समस्या सोडविण्यात फारसे गांभीर्य दाखवित नसल्याने गेली अनेक वर्षे या ठिकाणी नागरीक या कोंडीचा बोजा झेलत आहे. Uruli Kanchan
या समस्येला सोडवण्यासाठी पोलिस यंत्रणेचा शिस्त लावूनही फारसा उपयोग झाला नसल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलात नव्याने सामाविष्ठ झालेल्या या हद्दीत उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या वतीने शहराच्या हद्दीतील वाहतुक समस्या सोडविण्यासाठी वाहतुक नियोजन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार या हद्दीतील वाहतुक सुरळीत करण्यासाठी काही नवीन पर्याय प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार उरुळीकांचन शहरात प्रवेश करताना मुख्य चौक असलेल्या आश्रमरस्त्यावरुन प्रवेश दिला जाणार आहे. तर बाहेर पडताना तळवाडी चौकातून हॉटेल जानाई चौकमार्गे रस्ता दुभाजकाद्वारे प्रवास करता येणार आहे.
तर जेजुरी राज्य मार्ग असलेल्या शिंदवणे रस्त्यावरुन तळवाडी चौकातून वाहतुक शहरात जाण्यासाठी बंद करुन महाडीक पेट्रोल पंप चौकातून शहराकडेप्रवेश करण्याचे नियोजन आहे. या मुख्य बदलांनी मुख्य चौकात कोंडी फोडण्यासाठी मदत मिळण्याचे नियोजन आहे. त्यामुळे एलॉईट चौक व तळवाडी चौक या ठिकाणी महामार्ग कॉसिंग बंद करण्याचे नियोजन पोलिसांनी प्रस्तावित केले आहे.
हा सर्व वाहतुकीचा बदल संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळीकांचन मार्गे यवतकडे मार्गस्थ झाल्यानंतर उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना स्विकारून ३ जुलैनंतर वाहतुकीत बदल करण्याचे नियोजन उरुळीकांचन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस करणार आहेत.