Uruli Kanchan : बेबी कालव्याच्या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याने नागरीकांचा श्वास गुदमरला! पूर्व हवेलीत दूषित पाण्याने आरोग्याचा प्रश्न कायम…

जयदीप जाधव
Uruli Kanchan उरुळीकांचन : खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला अतिरिक्त पिण्यासाठी वापरात येणाऱ्या पाण्याच्या बदलत्या पुणे शहराच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पूर्व हवेली व दौंड तालुक्याच्या शेती सिंचनासाठी उपलब्ध करुन दिलेल्या बेबी कालव्याच्या दूषित युक्त पाण्याने कालव्याभोवती गावांचा व शहरीभागाचा आरोग्याचा प्रश्न उद्भवू लागला असून शुध्दीकरणाच्या नावाखाली या कालव्यात दुर्गंधी- युक्त व दूषित पाणी सोडल्याने नागरीकांचा श्वास गुदमरून जावू
लागला आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील अतिरिक्त पाणी वापर करण्यापाई पुणे महानगरपालिकेने पुणे शहराचे मुळा-मुठा नदीत सोडलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पूर्व हवेली व दौंड या तालुक्यांना वर्षाकाठी ६ टिएमसी पाणी उपलब्ध करुन दिले आहे. मात्र सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देताना जलशुद्धीकरण करुन हे पाणी सिंचनास उपलब्ध करुन दिले आहे. असे प्रमाण पुणे मनपा व खडकवासला जलसंपदा विभागाने केले असले तरी बेबी कालव्यात सोडलेले रसायन युक्त व दुर्गंधी युक्त पाण्याचा भेसळ युक्त दर्जा असल्याने हे पाणी शुध्दीकरणाची प्रक्रिया आहे की शेतकऱ्यांच्या डोळ्यांत घातलेली शुद्ध दूळफेक आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.
पुणे शहरातून सोडलेल्या सांडपाण्याचे मुंढवा जॅकवेल उभे करुन बेबी कालव्यात वर्षाला ६ टीएमसी पाणी सोडले जात आहे. पूर्व हवेली व दौंड तालुका मिळून ६० किलोमीटर अंतरावर हे पाणी शेतीला पुरविले जात आहे. या सिंचनाच्या पाण्यामुळे शेती सिंचनाचा दुष्काळजन्य परिस्थितीत शेतीला लाभ झाला आहे. मात्र या भागातील आरोग्याच्या समस्येबाबत मोठा दुषपरिणाम गेली ७ वर्षे नागरीक भोगू लागले आहेत. Uruli Kanchan
जलसंपदा विभागाने दौंड तालुक्यात शेतीसिंचनासाठी अस्तरीकरण, कालवा दुरूस्ती,पोटचाऱ्याया कामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र या भागातून शुध्दीकरणाची ओरड होऊनही या कालव्याच्या जलशुद्धीकरण अक्षम्य दुर्लक्ष झालेली बाब नागरीकांच्या मुळावर उठली आहे. फक्त शेतीला किती पाणी मिळेल इतकेच या योजनेचे उदिष्ट आहे की हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक हे पाहणे तितकेच महत्त्वाचे असून या प्रश्नाकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घालणे महत्त्वाचे बनले आहे.
बेबी कालव्याच्या दूर्गंधीयुक्त सिंचनाने हडपसर, शेवाळवाडी, कुंजीरवाडी, सोरतापवाडी,उरुळीकांचन या लोकवस्तीला आरोग्य समस्येचा गंभीर प्रश्न उभा राहू लागला आहे. या दूषित पाण्याने या भागात दुर्गंधीयुक्त वास पसरत असून तो शरीरालाअपायकारक आहे. तर या पाण्याने किडे, डास, मच्छर अशा किटकांचा फैलाव होत असल्याने आजाराला निमंत्रण मिळत आहे. या कालव्याच्या दुर्गंधीने साथीच्या आजाराचा फैलाव होत आहे. तर डेंग्य, चिकुणगुनिया सदृश आजारांंचा फैलाव होत आहे. या पाण्याने यापूर्वीच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत खराब केले असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात घातले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मुंढवा जॅकवेल मधून जलशुद्धीकरणाचे भान मनपा व जलसंपदा विभागाने ठेवावे अशी मागणी या भागातून होऊ लागली आहे.