Uruli Kanchan : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी निगडीत बँकेची कामे करण्यासाठी बँकेची उडवाउडवी; उरुळीकांचनला लाडक्या बहीणींना देण्यास बँक ऑफ इंडियाची बेपर्वाही..

Uruli Kanchan उरुळी कांचन: उरुळी कांचन येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखा प्रशासनाकडून ग्राहकांची,विशेषता वयोवृद्ध नागरिकांची व महिलांची अडवणूक करीत,त्रास दिला जात असल्याची शेकडो ग्राहकांची तक्रार. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, जमा होणारे पैसे काढण्यासाठी,जमा होणाऱ्या पेन्शनचे पैसे काढण्यासाठी बँकेत येणाऱ्या महिला व जेष्ठ नागरिक ग्राहकाला बँकेचे कर्मचारी उडवा – उडवीची उत्तरे देत,उर्मट पणाने बोलत,एकाच कामासाठी महिना महिना हेलपाटे मारायला लावत अडवणूक करीत त्रास देत आहेत अशी तक्रार शासनाच्या हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य, उरुळी कांचनचे माजी उपसरपंच रामभाऊ तुपे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
या शाखेतील कर्मचाऱ्यांवर त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने कडक कारवाई करीत, बँकेच्या ग्राहकांना सुरळीत व विनाविलंब सेवा पुरविण्याची मागणी केली आहे. बंद पडलेल्या बचत खात्याचे पुनरुज्जीवन करणे किंवा केवायसी करणे,अद्ययावत केलेले आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे,बँक खात्याला मोबाईल नंबर जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी ग्राहक बँकेत गेले असताना, त्यांना योग्य ते मार्गदर्शन न करता प्रत्येक कामाला आठ-आठ दिवसाच्या फरकाने बोलवत हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात आहे. तरीही त्या ग्राहकाला त्यांच्या खात्याची अद्ययावत स्थिती सांगितली जात नाही किंवा त्यांच्या खात्यातून आर्थिक व्यवहार केले जात नाहीत,
त्यामुळे या ग्राहकांची आर्थिक कुचंबना होऊन नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे अशी खंत अनेक महिला ग्राहकांनी बोलून दाखवली.मुळात १९६८ पासून कार्यरत असलेली ही बँक उरुळी कांचन मधील सर्वात मोठी बँक म्हणून नावारूपाला आली होती… मात्र सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त यंत्रणांनी सुसज्ज झालेली, यंत्रणा हाताशी असताना केवळ कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे या बँकेच्या ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गले लठ्ठ पगार घेणारे कर्मचारी शाखा व्यवस्थापकाच्या सूचनांना किंमत देत तर नाहीतच पण बँकेच्या आवारामध्ये (बिजनेस करस्पॉन्डन्स) व्यवसाय प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या महिला प्रतिनिधीकडे आपल्या कामासाठी जाण्यास सांगतात व ग्राहकाची पिळवणूक करतात.
शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की मी जास्तीत जास्त ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बंद पडलेली खाती चालू करण्यासाठी, केवायसीचे काम सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने, शाखेमध्ये गोंधळ होत आहे. लवकरात लवकर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुरळीतपणा आणण्याचा प्रयत्न राहील. आरबीआयच्या सूचनेप्रमाणे कर्मचाऱ्यांनी जेवणाची एकत्र सुट्टी न घेता कामकाज बंद न ठेवता या काळातही ग्राहकांना सेवा पुरविण्यात येईल.