Uruli Kanchan : उरुळी कांचनमध्ये मोठा दरोडा! हत्यारांचा धाक दाखवून चार लाखांचा मुद्देमाल लंपास, भयंकर घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

Uruli Kanchan : खिडकीतून घराची कडी उघडून अज्ञात ५ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून वृद्ध महिला, मुलगा व मुलीला मारहाण करून घरातील सोन्या -चांदीचे दागिने, दोन मोबाईल व एक दुचाकी असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेत जबरी लुट केल्याची घटना घडली आहे.
हि घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गारवा हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या अयोध्यानगर परिसरात आज मंगळवारी (ता.० २) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या घटनेत प्रथमेश संभाजी कुंजीर (वय. २२), स्नेहल संभाजी कुंजीर (वय. २० रा. दोघेही अयोध्यानगर, उरुळी कांचन, ता. हवेली ), या दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली आहे. तर शकुंतला कुंजीर (वय. ६५) यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आहे.
याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसात खबर देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. संभाजी पांडुरंग कुंजीर (वय.४५, रा. अयोध्यानगर, उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्या घरी चोरी झालेली आहे.
सविस्तर माहिती अशी की, संभाजी कुंजीर हे कुटुंबीयांसोबत उरुळी कांचन परिसरातील अयोध्यानगर परिसरात राहतात. काही कामानिमित्त ते बाहेर गेले होते. यावेळी घरामध्ये मुलगा प्रथमेश, मुलगी स्नेहल, आजी शकुंतला कुंजीर (वय. ६५), बहिण लता संजय मेमाणे (वय.४०), मुकबधीर भाची सीमा मेमाणे, असे सर्वजण घरी झोपले होते.
घरी झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून घराचा दरवाजा उघडला व घरात प्रवेश केला. यावेळी चौघेजण घरात आले व त्यातील एकजण हा घराच्या बाहेर रेकी करण्यासाठी थांबला. यावेळी घरामध्ये वृद्ध महिला शकुंतला या झोपल्या असता घरात घुसलेल्या एका चोरट्याने शकुंतला यांच्या गळ्याला चाकू लावला. यावेळी त्यांनी घरातील इतर सदस्यांना आवाज दिला.
यावेळी घरातील खोलीत झोपलेला प्रथमेश तसेच मुलगी व इतर सर्व सदस्य हे एका ठिकाणी पोहोचले. यावेळी चोरट्यांनी वृद्ध आजींना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रथमेश याने त्यास विरोध केला असता, त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच बहिण स्नेहल हिने सोडवण्याचा प्रयत्न केला असता तिलाहि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे ५ तोळे दागिने व स्नेहल, वृद्ध आजी शकुंतला कुंजीर, आत्या यांच्या गळ्यातील २ तोळे असे तब्बल साडेतीन लाख रुपयांचे दागिने, दोन मोबाईल फोन व घरासमोर लावलेली दुचाकी असा सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केला. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.