मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे हाहाकार, २७ जणांचा वीज कोसळून मृत्यू..

मुंबई : मराठवाड्यात अवकाळी पावसाने मागील १७ दिवसांपासून थैमान घातले असून, या पावसाने बळीराजाचे मोठे नुकसान केले आहे. आतापर्यंत या नैसर्गिक आपत्तीत २७ नागरिकांचा मृत्यू, २१ जण जखमी, तर ३९१ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

यासोबतच ४,००० हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाल्याची अधिकृत नोंद आहे. विजेचा कडकडाट आणि सततचा पाऊस यामुळे बळीराजा पुरता हादरून गेला आहे. खरिपाच्या तयारीला सुरूवात झालेली असतानाच आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलं आहे. आर्थिक आणि मानसिक दडपणात शेतकरी सापडला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, मृतांमध्ये सर्वाधिक ७ जण जालना जिल्ह्यातील होते. विजेच्या कडकडाटामुळे वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना अनेक जिल्ह्यांमध्ये घडल्या आहेत. ३९१ जनावरे मृत्युमुखी पडल्यामुळे पशुपालकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

बीड आणि परभणी जिल्ह्यात काही घरांची पूर्णतः पडझड झाली असून, ८४ घरे अंशतः कोसळली आहेत. मराठवाड्यातील ५९७ गावांवर पावसाचा प्रत्यक्ष परिणाम झाला असून ७,१६४ शेतकरी बाधित झाल्याची नोंद आहे.
अवकाळी पावसामुळे नांगरणीपूर्व मशागत पूर्ण होऊ शकलेली नाही. परिणामी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारकडून तत्काळ पंचनामे सुरू करण्यात आले असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी वाढत आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. झाडाखाली थांबणं, विजांच्या वेळी घराबाहेर जाणं टाळणं यासारख्या सूचना देण्यात आल्या आहेत.