उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले ; काही विद्युत खांब , झाडांची पडझड ; गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान ….

उरुळी कांचन : पूर्व हवेली तालुक्यात उरुळी कांचन परिसर तसेच पश्चिम दौंड तालुक्यातील गावांना अवकाळी पावसाने प्रचंड झोडपले असून बुधवार ( दि.१) रोजी सायंकाळी चारनंतर झालेल्या जोरदार वाऱ्यासह गारांच्या सरी कोसळल्या असून विजेचे खांब कोसळले असून काही ठिकाणी झाडांची पडझड होऊन कांदा, गहू व फळबागांचे नुकसान केले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,सोमवारी अवकाळी पावसाने हुलकावणी दिल्यानंतर पूर्व हवेली तालुक्यात अवकाळी पाऊस मंगळवारी प्रचंड बरसला आहे. वाऱ्यासह गारांच्या तडाख्यात पडलेल्या पावसाने उरुळीकांचन परिसरासह शिंदवणे, वळती, तरडे भागाला प्रचंड झोडपले आहे. दौंडच्या पश्चिम भागातही या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने गहू, मका,कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा पिक वाहून गेले आहे. तर फळबागांची पडझड झाली आहे.
उरुळी कांचन परिसरात शिंदवणे, वळती गावात गारांसह झालेल्या पावसाने गहू व कांदा पिकाचे नुकसान केले आहे. तर या भागात विद्युत खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा बंद झाला आहे. अवकाळी पावसाने गारांसह मोठे शिडकाव केल्याने या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान अटळ आहे. सुमारे दोन तास चाललेल्या पावसाने कांदा पिकाला झोडपल्यानेकांद्याच्या उन्हाळी उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
