पंतप्रधानांच्या ताफ्यातील SPG कमांडोचा कालव्यात पडून दुर्दैवी मृत्यू…!

निफाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SPG अंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची सुरक्षा व्यवस्था SPG कमांडोच्या हातात आहे. हे देशातील सर्वात विशेष सुरक्षा दल मानले जाते. मात्र नाशिकमध्ये एसपीजी कमांडोच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
मेंढी येथील जवान गीते हे सहकुटुंब मोटारसायकलने येत असतांना पत्नी व मुलांसह तोल जाऊन गोदावरी उजव्या कालव्यात पडले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पत्नी व मुलांना वाचविण्यात यश आले मात्र गणेश कालव्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
मेंढी येथील गणेश सुकदेव गिते (वय ३६) हे केंद्रीय राखीव सुरक्षा बलात कार्यरत असून पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा पथकात तैनात आहेत. (ता .२४ फेब्रु) रोजी ते गावी लग्नानिमित्त सुट्टीवर आले होते. ते सहकुटुंब पत्नी रुपाली (वय ३०), मुलगी कस्तुरी (वय ७) व मुलगा अभिराज (१.५ वर्षे) हे सर्व मोटारसायकलने शिर्डीला गेले होते. गुरुवार (दि.१०) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते गोदावरी उजव्या कालव्याने परतत असताना मेंढी-ब्राम्हणवाडे वळणावर त्यांचा तोल गेला व मोटारसायकल सह सर्वजण कालव्यात पडले.
याचदरम्यान जवळच्या नागरिकांनी धाव घेत पत्नी व मुले यांना वाचविण्यात यश मिळवले, मात्र गणेश प्रवाहाबरोबर वाहून गेले. एन.डी.आर.एफ.च्या चमूने खूप शोध घेतला असता आज (ता .१०) दुपारी २.३० च्या सुमारास घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर मोरी परिसरात गणेश यांचा मृतदेह आढळून आला. गणेश यांचा मृतदेह शवविच्छेदसाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून या घटनेने सिन्नर तालुका व नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती कळताच सिन्नर औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे स.पो.नि.संदेश पवार, पो.कॉ.हिरामण बागुल, विजयसिंग ठाकुर, पो.ना.धनाजी जाधव, विनोद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.