शुल्लक उधारीसाठी मामाने दोन भाचांना संपवलं, रात्रीच बोलावलं अन्…: घटनेने नागपूर हादरलं

नागपूर : नागपूरच्या गांधीबाग गार्डन जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी मामाकडून बांगड्या खरेदी करून त्याची विक्री करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना मामाने उधारीवरून जीवानिशी मारले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बदन सिंह त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच त्याला अटक केली आहे. मध्यरात्री गांधीबाग जवळच्या कालीमाता मंदिरासमोर ही घटना घडली. या घटनेमध्ये दीपक राठोड आणि रवी राठोड या दोन सख्ख्या भावांचा खून झाला. यामुळे सगळेच हादरले. याबाबत माहिती अशी की, दीपक आणि रवी हे नागपूर शहरातील हंसापुरी भागात राहत होते.
दोघेही बदनसिंह यांच्याकडून बांगडी खरेदी करायचे व शहरात विकायचे. तो नात्याने मामा आहे. त्याच्याकडून होलसेल दराने हे दोन भाचे बांगड्या विकत घ्यायचे. असे असताना त्यांच्याकडे काही उधारी राहिली होती. त्यामुळे उधारी लवकर द्या म्हणून बदनसिंह हा दोघांकडे पैसे मागत होते.

यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक वाढत गेली. रात्री गांधीबाग येथील कालीमाता मंदिरासमोर हे तिघेजण थांबले होते. त्यावेळी तिघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी बदनसिंह याने रवी राठोड याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याच्यामध्ये रवी जागेवरच पडला.
त्याला वाचवण्यासाठी दीपक हा धावत आला. त्याच्यावरही बदनसिंह याने चाकूने वार केले. दोघेही जखमी झाले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच रवीचा मृत्यू झाला होता, तर दीपकचा मृत्यू सोमवारी पहाटे झाला. यामुळे सगळेच हादरले असून याबाबत पोलीस तपास करत आहेत.