पुण्यातील अनधिकृत इमारती धारकांचे धाबे दणाणले! बांधकामांसंदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा..

पुणे : सध्या पुण्यात विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून, अनेक ठिकाणी ते धोकादायक देखील ठरत आहेत. यावर वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या असूनही कारवाई झाली नाही. असे असताना पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आज अधिवेशनात विधान परिषदेचे सदस्य योगेश टिळेकर यांनी पुण्यातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत आणि अभिजित वंजारी यांनीही सहभाग घेतला. यावर प्रत्युत्तर देताना डॉ. सामंत यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीचे संकेत दिले.

याबाबत आता गुरुवार पेठ परिसरासह अन्य भागांतील परवानगीविना उभारलेली शेड्स व इमारती पाडण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर आता कारवाई होणार आहे.

धार्मिक स्थळांच्या अधिकृत बांधकामांना कोणताही त्रास दिला जाणार नाही. मात्र ज्या इमारती परवानग्यांशिवाय उभारल्या गेल्या आहेत, त्यांच्यावर तात्काळ सुनावणी घेऊन पाडकामाची कारवाई केली जाईल. तसेच महत्वाचे म्हणजे, ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी अशा बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, त्यांचीही चौकशी करण्यात येईल.
यामुळे PMC मधील संबंधित विभागांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे आता याबाबत चौकशी होणार आहे. आता मंत्र्यांच्या या घोषणेनंतर महापालिका व संबंधित यंत्रणांकडून तातडीची कारवाई अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या या पावलामुळे पुणेकरांना कायदेशीर आणि सुरक्षित बांधकामांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
