उजनी धरणाचं पाणी विषारी, परिसरातील रहिवासी भयंकर आजारांनी त्रस्त, धक्कादायक माहिती आली समोर…

भिगवण : उजनी धरणातील धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे. यामुळे हे पाणी पेयच की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. येथील पाणी दिवसेंदिवस अधिकाधिक विषारी होत चालल्याने आता ते धरण विषारी झाले आहे. यामुळे हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत जलतज्ज्ञ आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून दरवर्षी 20 टीएमसी विषारी सांडपाणी उजनी धरणात मिसळले जात असल्याने 117 टीएमसीच्या संपूर्ण जलसाठ्याचे रसायनिक प्रदूषण झाले आहे. धरण क्षेत्रातील लोकांना याचा परिणाम जाणवत आहे.
आज धरण परिसरात डॉ. सिंह यांनी पाहणी केली. ते म्हणाले, धरण परिसरातील अनेक नागरिक कॅन्सर आणि त्वचारोगासारख्या दुर्धर आजारांनी ग्रस्त आहेत. हे गंभीर चित्र पाहता, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणणे आणि तत्काळ कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. सिंह यांनी धरणाच्या तळात साचलेल्या पांढऱ्या रंगाच्या थराची पाहणी केली.

हे थर म्हणजेच उद्योगधंद्यांमधून येणाऱ्या रसायनांचे अवशेष आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वस्त दरात शुद्ध पाणी मिळते आणि तिथून निघालेले सांडपाणी उजनी धरणात येते यामुळे परिस्थिती भयंकर आहे. येथील लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. हे केवळ पाण्याचे प्रदूषण नाही, तर संपूर्ण जलव्यवस्थेचा ऱ्हास असल्याचा इशारा त्यांनी दिला.
यामुळे राज्य शासनाने यावर उपाय करणे गरजेचे आहे. याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, युवक सर्वांनीच यात पुढाकार घेतला पाहिजे. जलचर प्राणी मृत्युमुखी पडत असून, धरणातील पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.