“बाबरी पाडली तेव्हा बिळात लपले होते, भाजपने आपले हिंदुत्व स्पष्ट करावे!” : उद्धव ठाकरे
मुंबई : बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे ‘उंदीर’ बिळात लपले होते. भाजपकडे कोणतेही शौर्य नव्हते. बाबरी पाडली त्या वेळी, दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला.
त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपकडे शौर्य नव्हते त्यावेळी मुंबई शिवसेनेने वाचवली आहे. त्यावेळी पंतप्रधानांचे नाव देखील कुठेही नव्हते.
बाबरी पाडली त्या वेळी, दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली. बाबरी मशिदीबाबत ही बातमी आल्यानंतर बाळासाहेबांना फोन आला तेव्हा ते बोलले, माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत.
आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे मोहन भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. एका मस्तीत चंद्रकांत पाटील बोलतायत. त्यांनी अडवाणींची मुलाखत पाहावी. बाळासाहेबांचे नाव घेऊ नये.
मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो पण पंतप्रधानांची हिंमत झाली नाही शेवटी निकाल कोर्टाने दिला. मिंधेंना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरू नये. बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाहीत.
श्रेयवादाचा प्रश्नच नाही. चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसतं ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाही म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. यांचे गोमूत्रधारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातला आहे. त्यांचा चेहरा अत्यंत विकृत आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत? की स्वत:च स्वत:ला जोडे मारणार आहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.