उद्धव ठाकरे यांचे खासदार पुन्हा एकदा फुटणार? शरद पवार यांनी केलं मोठं विधान…

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला पुन्हा भगदाड पाडण्याचा हलचाली सुरू झाल्या आहेत. केवळ ठाकरे सेनाच नाही तर काँग्रेसला पण खिंडार पाडण्यात येणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. तर दुसरीकडे ठाकरे गोटातून ही संमिश्र प्रतिक्रिया आल्याने राज्यात राजकीय भूकंप होणार अशी चर्चा होत आहे.
उदय सामंत यांनी विधानसभेतील दारूण पराभवावरून उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावा करत, चार आमदार आणि तीन खासदार लवकरच शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. रत्नागिरीत त्यांचा पक्ष प्रवेश ट्रेलर दाखवला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
आता महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी कोल्हापूरमध्ये त्यांनी अनेक मुद्दांवर पत्रकार परिषदेत थेट मतं मांडली. त्यांनी यावेळी सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांनी या दाव्याला उत्तर देताना उदय सामंत यांना टोला मारला. दावोसला गुंतवणुकीसाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे राजकारणात एक नवा वाद उफाळला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाला अधिक गर्दी झाली, असे पवार म्हणाले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी निष्ठावंत कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारली आहे. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वतंत्र लढण्याचा विचार करत असतील, तर महाविकास आघाडीत त्यावर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले आहे.