भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, शिरवळ येथील घटना…

शिरवळ : येथील शिंदेवाडी- भोर रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नजीर पठाण हा सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या दुर्दैवी निधनाने होळ- मुरूम गावात शोककळा पसरली आहे. रविवारी हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, या गाड्यांचा अक्षरशः भुगा झाला आहे.

मृतांमध्ये बारामती तालुक्यातील होळ-साळोबावस्ती येथील नजीर जावेद पठाण (वय-१८) आणि गडचिरोली जिल्ह्यातील सचिन बळीराम मडावी (वय-२२, रा. कुरडी) यांचा समावेश आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून सविस्तर माहिती समोर आली नाही.

या अपघातात विश्वजित विठ्ठल खोमणे (वय-१९, रा. मुरूम, ता. बारामती), वैभव नितीन भिसे (वय-१९, रा. होळ, ता. बारामती) आणि अमोल नामदेव लिगसे (वय-२०, रा. लक्ष्मीनगर, जालना) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेतली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. वाहतूक देखील थांबली होती. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
