जेवण बनवण्यावरून दोन रूममेटमध्ये जोराचं भांडण, एकानं चाकू काढला अन्… पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेवण बनवण्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका रूममेटने दुसऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मोई परिसरातून समोर आली आहे. या हल्ल्यात ५४ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामनरेश बुद्धिलाल रावत (वय ५४) आणि आरोपी राकेश वर्मा हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून कामाानिमित्त मोई येथील एका खोलीत एकत्र राहत होते.
तसेच १६ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्यात जेवण बनवण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात राकेश वर्माने घरातील चाकू काढून रामनरेश यांच्यावर वार केले. दरम्यान, या हल्ल्यात रामनरेश रावत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेनंतर तीन दिवसांनी, सोमवारी (१९ जानेवारी) त्यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राकेश वर्मा याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
