लोणीकाळभोरला जुन्या भांडणातून दोन जणांना धारधार शस्त्राने वार; दोघांना अटक….

लोणी काळभोर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी दोघांना धारधार शस्त्र व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील काळे वस्ती परिसरात घडली आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी दिपक संतोष जाधव (वय २३, रा. थेऊर, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंभु राजेंद्र खवळे (वय २३, रा. सर्वे नं. ३१६, खुजरे वस्ती हजरबाग दर्ग्यासमोर वैदवाडी, हडपसर, पुणे सध्या रा. इंदिरा कॉलणी थेऊर ता. हवेली जि. पुणे), बाबु उर्फ सुमित संजय लोंढे (वय २१ रा. इंदिरा कॉलणी, थेऊर ता. हवेली जि. पुणे), ऋतीक राजु लोंढे व सुनिल संजय लोंढे (दोघेही थेऊर ता. हवेली जि. पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांतील शंभु खवळे व सुमित लोंढे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारहाणीत दिपक जाधव व राजेश चव्हाण (दोघेही, रा. थेऊर, ता. हवेली) हे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीपक व राजेश हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांची वरिल चार जनांशी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. याचा राग मनात धरून ते दिपक यांच्या काळेवस्ती येथील घरासमोर आले. तेव्हा दिपक व राजेश हे दोघे घराबाहेर थांबले होते. तेव्हा सुमित लोंढे हा दिपक याला तुम्ही लई मोठा भाई झाले का रे असे म्हणाला व शिवीगाळ केली.
त्यानंतर बाबु लोंढे याने त्याच्या हातातील धारधार हत्याराने दीपक जाधव यांना मारहाण करुन जखमी केले. भांडणे सोडविण्यासाठी राजेश चव्हाण यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. व ते निघून गेले. याप्रकरणी दीपक जाधव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शंभु खवळे व सुमित लोंढे याला त्वरित अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवस (बुधवार ६ ऑगष्ट) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन जण गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.