पार्ट टाईम नोकरीच्या अमिषाने दोन जणांना लाखोंचा गंडा; विश्रांतवाडी, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
पुणे : पार्ट टाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची आणि एका युवकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. सायबर गुन्हेगारांनी दोघांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
याप्रकरणी महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तर युवकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांना त्यांच्या व्हॉट्सअप व मेसेज करुन पार्ट टाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना विविध टास्क देऊन त्यांना पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी पैसे भरले.
पैसे भरल्यानंतर फिर्यादी यांना नोकरी न देता सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांची १३ लाख २७ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका मोबाईल क्रमांक धारक तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
युवकाची १८ लाखांची फसवणूक
हडपसर पोलीस ठाण्यात ३९ वर्षाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन पार्ट टाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांना विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपींनी सांगितल्या प्रमाणे टास्क पूर्ण केले.
तसेच त्यांना विविध बँक खात्यात १८ लाख ७० हजार २०० रुपये भरण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.