नात्यातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार ; वडकी येथील पाच वर्षांपूर्वीची घटना, अखेर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला ठोठवली शिक्षा

लोणी काळभोर : नात्यातील व्यक्तीने ओळखीचा फायदा घेऊन दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली होती.या गुन्ह्यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरी व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश डि.पी.रागीट यांनी दिले आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उरुळी देवाची (ता. हवेली) परिसरात सन २०२० मध्ये घडली होती. सुनील कोंडीबा जेधे (वय ५६, रा. मु.पो.भिवडी, ता.पुरंदर, जि.पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका ३३ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी महिलेचा सुनिल जेधे हा नातेवाईक असल्याने तो त्यांच्या घरी वारंवार ये-जा करत होता. याचा फायदा घेऊन त्याने फिर्यादीच्या १३ आणि १४ वर्षांच्या दोन मुलींना विविध कारणे सांगून बाहेर नेले आणि उरुळी देवाची परिसरातील लॉजमध्ये नेऊन त्यांच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
या घटनेची कोठेही वाच्यता केली तर तुमच्या आई-वडिलांना ठार मारून टाकील अशी धमकी दिल्याने त्या मुली गप्प राहिल्या. परंतु त्यांच्या वर्तनातील बदल निदर्शनास आल्याने कुटुंबीयांनी केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या.

सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला २० वर्ष सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी व भारतीय दंड संहिता कलम ५०६ अन्वये एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यात सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, तापसी अधिकारी व्हि.पी.झिंजुकॆ, सहाय्यक फौजदार विनोद कांबळे, पोलीस हवालदार अश्विनी पवार व पोलीस अंमलदार अशोक शिंदे यांची बहुमुल्य मदत मिळाली.