‘वक्फ’वरून अजितदादांच्या पक्षात दोन गट? आधी पाठिंबा दिला, आता घेणार अमित शहा यांची भेट, नेमकं काय घडलं?

मुंबई : लोकसभेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली, तर ९५ ने विरोध केला. दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्याने त्याचे कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला.
आता वक्फ सुधारणा कायदा देशभरात लागू झाला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. या वक्फ सुधारणा विधेयकाला अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता.
त्यानंतर आता, अजितदादांच्या पक्षात नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा आहे. पक्षातील नाराजीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वक्फ सुधारणा विधेयकातील काही मुद्यांबाबत ही भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीत राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ अमित शाह यांनी सभागृहात जे आश्वासन दिलं ते कागदावर असाव अशी मागणी करणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वक्फ बोर्डावर गैर मुस्लिम सदस्य नको, अशी आग्रही भूमिका घेण्यात येणार आहे. अनेक वर्षापासून वक्फ बोर्डकडे जी जमीन आहे, त्याचे मूळ मालक कोण याचा शोध घेण्याबाबत जो मुद्दा मांडला आहे त्याचा विचार करावा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संसदेत सादर केलेल्या विधेयकामधे ४० पैकी १४ विषय बाजूला करण्यात आले आहेत, अशी सभागृहात माहिती देण्यात आली त्याबाबत देखील कागदोपत्री स्पष्टता आणावी याबाबत देखील विनंती अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.