एका दगडात दोन पक्षी; शिंदेंचा नाईकांच्या बालेकिल्लाला सुरुंग तर छत्रपती संभाजीराजेनांही धक्का, बडा नेता गळाला..

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. भाजपचे मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्लाल्या सुरुंग लावत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांना धक्का दिला आहे.महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये अंकुश कदम यांचा पक्षप्रवेश केला जाणार आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपसह छत्रपती संभाजीराजेना मोठा धक्का बसणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी मुंबईत ताकद वाढली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते उपाध्यक्ष अंकुश कदम यांच्यासह अनेक समर्थक शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अंकुश कदम हे नवी मुंबईत मराठा चेहरा म्हणून ओळखले जायचे. मात्र, त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. कदम यांनी मराठा स्वराज्य पक्षाला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे छत्रपती संभाजीराजे यांना मोठा धक्का बसला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंकुश कदम यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या हालचालींमुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
अंकुश कदम हे नाव मराठा आरक्षणच्या चळवळीमध्ये सर्व परिचित असं नाव आहे, त्यांना “बाबा” या नावाने ओळखलं जात.त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक ही स्वराज्य पक्षाकडून भाजप नेते गणेश नाईक यांच्या विरुद्ध ऐरोली मतदार संघातून लढवली होती पण या निवडणुकीत त्यांना अपयश आलं. मात्र या अपयशातून न खचता त्यांनी आपला दांडगा जनसंपर्क हा संपूर्ण नवी मुंबई मधे कायम ठेवला आणि मराठा आरक्षणच्या लढाईमध्ये अलीकडे ते पूर्ण ताकदीने उतरले. अंकुश कदम यांची लोकप्रियता ही तरुणांमधे मोठ्या प्रमाणात आहे, कारण ते नेहमी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई लढत आले आहेत. शिवाय सातारा जिल्ह्यातील मातीचा हा तरुण आहे, त्यामुळे लढण्याची कला त्यांना जन्मापासून उपजत आहे. आता शिंदे यांच्या सेना त्यांनी प्रवेश केल्याने निवडणुकीच्या तोंडावर त्यांची ताकद वाढली आहे
