संतोष देशमुख हत्या प्रकरणी ट्विस्ट, विष्णू चाटेने मागे घेतला अर्ज, कराडच्या अर्जावरील…,सुनावणीत नेमकं काय घडलं?

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज (ता. १९) बीड येथील विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. तसेच या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने आज आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याबाबतचा अर्ज मागे घेतला.

तसेच मी निर्दोष असून या प्रकरणाशी माझा संबंध नाही, असा आशयाचा अर्ज त्याने मागच्या सुनावणीला दाखल केला होता. मात्र त्यांच्या वकिलाने हा अर्ज मागे घेतला आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार आणि प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याचे वकील विकास खाडे यांनी मागच्या सुनावणीच्या वेळेस सरकारी वकिलाकडून जी कागदपत्रे मिळाली, त्या आधारावर या घटनेशी संबंध नसल्याचा अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी ३ जूनपर्यंत पुढे ढकलली.

या शिवाय आरोपीचे वकील खाडे यांनी न्यायाधीशांकडे खटल्यातील संपूर्ण कागदपत्रे आणि तसेच पुराव्यासंबंधीची सविस्तर माहिती अद्यापही बचाव पक्षाला मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. पेन ड्राईव्ह अद्याप मिळाला नाही, असे आरोपीच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायाधीशांनी बचावपक्ष मागणी करत असलेले सर्व पुराव्यासंबंधीची माहिती तसेच अत्यावश्यक कागदपत्रे तत्त्काळ देण्यासंदर्भात सूचना केल्या.
दरम्यान, १९ मेरोजीच्या सुनावणीला धनंजय देशमुख यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्वल निकम गैरहजर होते. यामुळे आजच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते.