कल्याण पूर्व राजकारणात ट्विस्ट ; भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याचा युटर्न, मध्यरात्री खलबत?

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना कल्याण पूर्वच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेले महत्त्वाचे नेते महेश गायकवाड यांनी ऐनवेळी यू-टर्न घेतला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटात घरवापसी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मध्यरात्रीच्या मोठ्या खलबतीमुळे ही घरवापसी झाली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर आता घर वापसीनंतर कल्याण पूर्व आणि उल्हासनगर या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांची संपर्कप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महेश गायकवाड हे भाजपचे महत्त्वाचे नेते रवींद्र चव्हाण आणि स्थानिक भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार होता. याची तयारीही पूर्ण झाली होती. भाजप प्रवेशाची तयारी अंतिम टप्प्यात असताना शिंदे गटाला डॅमेज होण्याचा धोका लक्षात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट मध्यरात्री महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला आणि मनधरणी केली. केवळ घरवापसी नव्हे, तर महत्त्वाच्या संपर्कप्रमुखपदाची ऑफर दिली. संपर्कप्रमुख हे पक्ष संघटनेतील एक अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते, ज्यामुळे महेश गायकवाड यांना त्यांच्या मतदारसंघात पुन्हा राजकीय वजन प्राप्त झाले आहे.

दरम्यान महेश गायकवाड यांचा शिंदे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातून सुरू झाला. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर, महेश गायकवाड यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली. महायुतीचे अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे गटाने तात्काळ त्यांची हकालपट्टी केली. ज्यामुळे महायुतीत स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला होता.या हकालपट्टीनंतर, महेश गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आपली राजकीय ताकद कायम ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर अखेर त्यांनी शिंदे गटात घर वापसी केली.

