दिल्लीत खलबत!शरद पवारांशी युती करण्यावर अमित शहांचा ग्रीन सिग्नल, राष्ट्रवादीच्या बैठकीत काय चर्चा?

दिल्ली : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतली. या भेटीत शरद पवारांशी युती करण्यावर अमित शहानीं ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री अमित शाहांशी केलेल्या 15 मिनिटांच्या चर्चेत महापालिका निवडणुकांचे रणनीती ठरवण्यात आली आहे. राज्यात जिथं युती करणे शक्य असेल तिथ युती करा, अशा सूचना अमित शाह यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक पातळीवर राजकीय समिकरणे जुळवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जावे लागले किंवा काही ठिकाणी जुळवून घ्यावे लागले, तर त्याला अमित शाह यांची काहीही हरकत नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये देखील तयारीला वेग आला आहे.

दरम्यान आगामी राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात स्वबळाची घोषणा केली आहे.
