पुण्यातील दोन लेकरांच्या आईने कमालच केली राव! मराठमोळ्या नववारी साडीत माउंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा..
पुणे : पुण्यातील दोन लेकरांच्या आईने जगातील सर्वांत उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. नववारी साडी नेसून माउंट एव्हरेस्टवर तिरंगा झेंडा फडकाविताना एक आदर्श प्रस्थापित केला आहे.
बाणेर येथील गिर्यारोहक सुविधा कडलग असे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
पुणे ते दिल्लीमार्गे काठमांडू ते रामशाप असा प्रवास करून सुविधा यांनी गेल्या ८ एप्रिल रोजी या मोहिमेस सुरुवात केली. १७ मे रोजी सकाळी अकरा वाजता त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. ‘दी अल्पायनिस्ट’ या गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भगवान चवले यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत सुविधा कडलग, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे हे सहभागी झाले. या गिर्यारोहकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला.
प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि अचानक बदललेल्या प्रतिकूल वातावरणामध्येही सुविधा यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी माउंट एव्हरेस्टवर नववारी साडी परिधान करून हातात भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. तसेच भारताचा तिरंगा ध्वज हाती घेऊ त्यांनी या अतिउच्च शिखरावर जल्लोष केला.
सुविधा कडलग याबाबत बोलताना म्हणाल्या की, उणे २० अंश सेल्सिअस तापमानात प्रचंड थंडी, रात्रीच्या प्रहरी चढाई, अशा कठीण परिस्थितीत सकारात्मक विचारांची साथ हे शिखर सर करण्यासाठी अधिक बळकटी देणारी ठरली. शिखर सर केल्यानंतर मोहिमेवरून परतताना पाय घसरला. मात्र, मी सुदैवाने वाचले. एव्हरेस्ट शिखराची यशस्वी मोहीम आयुष्यभर ऊर्जा देणारी आहे.