विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहतुकीत बदल, कसा असेल मार्ग, जाणून घ्या…

पुणे : १ जानेवारी रोजी पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी दरवर्षी मोठी गर्दी होत असते. यामुळे याठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी यामध्ये बदल करण्यात आला आहे. यावेळी पुणे-अहिल्यानगर महामार्गवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ५ वा. पासून ते १ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२:०० वा. पर्यंत वाहतुकीत बदलाचे आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले.
यावेळी काही चुकीचा प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
यामध्ये चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अहिल्यानगर कडून पुणे-मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे वळवली आहेत.
तसेच या काळात पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण येथून हडपसरवरुन पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरुर-अहिल्यानगर मार्गे जातील. सोलापूर महामार्गावरुन आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे विश्रांतवाडीहून आळंदी व चाकण या ठिकाणी वळवण्यात आली आहेत.
यावेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यामुळे पर्यायी मार्ग सगळ्यांनी बघावेत असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने, वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जातील.
या ठिकाणी गर्दी लक्षात घेता मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी कार, जीप आदी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहिल्यानगरकडे जातील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.