९ महिने छळ अन् ४ वेळा PSI कडून अत्याचार, हातावर सुसाईड नोट लिहून साताऱ्यात महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं…

सातारा : एका महिला डॉक्टरने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर यांनी आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालयात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, गेल्या काही महिन्यांपासून या महिला डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरु होती.

आपल्यावर अन्याय होत आहे, मी जीव देईन, अशी तक्रारही त्यांनी वरिष्ठांकडे यापूर्वी केल्याची माहिती आहे. त्यानंतर अखेर गुरुवारी (त.२३ ऑक्टोबर) रात्री त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांच्या या निर्णयाने फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

डॉ. मुंडे या काही दिवसांपासून वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादामुळे सतत चौकशीला सामोऱ्या जात असल्याची माहिती समोर आली होती. माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन, अशी तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात दिल्याचे समजते. मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काल उशिरा रात्री आत्महत्या केली.
दरम्यान, घटनास्थळी तपासादरम्यान डॉक्टरांच्या हातावर लिहिलेली एक सुसाईड नोट आढळली. त्यात त्यांनी पोलिस PSI गोपाल बदने यांनी चार वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा आणि पोलिस कर्मचाऱ्याने प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या खुलाशामुळे पोलिस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
माझ्यावर अन्याय होत असल्याची तक्रार त्यांनी वारंवार केली होती. हा अन्याय आपण सहन करणार नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून महिला डॉक्टर यांनी आपल्या आपल्या आयुष्याची अखेर का केली याचं कारण शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत.
